Manipur news – मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या कॅम्पवर जमावाचा हल्ला; दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमधील सेनापती जिल्ह्यात मंगळवारी रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आसाम रायफल्सच्या पथकाने संशयित सशस्त्र बंडखोराचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली होती. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने सेनापती शहरातील आसाम रायफल्सच्या कॅम्पला लक्ष्य केले.

सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केल्याचे समजताच जमावाने आसाम रायफल्सच्या कॅम्पकडे मोर्चा वळवला. जमावाने कॅम्पवर दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना हवेत गोळीबार करावा लागला आणि अश्रूधुराचे नळकांडे सोडावे लागले. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती जिल्ह्यातील ओकलॉन्ग येथील NSCN (IM) च्या नियुक्त कॅम्पपासून सुमारे 2 किलोमीटर पश्चिमेला असलेल्या माकुइलोंगडी भागात सशस्त्र बंडखोर वावरत असल्याची विश्वासार्ह गुप्तचर माहिती आसाम रायफल्सला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने परिसरात गस्त आणि शोधमोहीम सुरू केली होती. ही शोधमोहीम सुरू असताना माकुइलोंगडी आणि ओकलॉन्ग गावांच्या दिशेने जाणाऱ्या आसाम रायफल्सच्या तुकड्यांना स्थानिक रहिवाशांनी अडवले. जमावामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

सुरक्षा दलांनी कमालीचा संयम बाळगत स्थानिक प्रतिनिधींशी संवाद साधला. ही मोहीम केवळ शांतता आणि सुरक्षेसाठी आहे आणि स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय सुरक्षा दले कोणत्याही गावात प्रवेश करणार नाहीत, असे आश्वासन त्यांनी दिले. असे असतानाही तणाव वाढतच गेला. रात्री सुमारे 9 च्या सुमारास सेनापती शहरात मोठा जमाव गोळा झाला आणि त्यांनी आसाम रायफल्सच्या कॅम्पकडे मोर्चा काढत दगडफेक सुरू केली.

परिस्थिती हाताळण्यासाठी सेनापती पोलीस आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास जमाव मागे हटत असताना एका गटाने आसाम रायफल्सच्या वाहनांची प्रचंड तोडफोड केली. सुरक्षा दलाचे एक वाहन जाळण्यात आले, तर दोन ट्रक उलटवून त्यांचे नुकसान करण्यात आले. यावेळी एका कारलाही आग लावण्यात आल्याची माहिती आहे. आसाम रायफल्स, मणिपूर पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे मध्यरात्रीपर्यंत जमावाला पूर्णपणे पांगवण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. सध्या सेनापती जिल्ह्यातील परिस्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात आहे.