शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरण, देशव्यापी आरोग्य सेवा बंद ठेवण्यासाठी ‘आयएमए’ची उद्या बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आग्रही आहे. आयएमए महाराष्ट्र शाखेने १६ जुलै रोजी ऑनलाइन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत देशव्यापी आरोग्य सेवा बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे. तसेच म्हात्रे यांची तक्रार थेट पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करण्यासाठी डॉक्टरांचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे.

‘आयएमए’चे महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई आणि राज्य खजिनदार डॉ. अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या बैठकीत देशातील विविध राज्यांतील आयएमएचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंके यांना झालेल्या मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या घटनेचा केवळ निषेध करून थांबता कामा नये तर अशा प्रवृत्तींना कायमचा आळा बसण्यासाठी कठोर पावले उचलली जावीत, अशी भूमिका अनेक राज्यांतील डॉक्टरांनी घेतली आहे. देशभरातील डॉक्टरांनी राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व्यापक आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी १६ जुलैची आपत्कालीन बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

“डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत रुग्णसेवा देत असतात. अशा परिस्थितीत कोणताही लोकप्रतिनिधी किंवा व्यक्ती रुग्णालयात घुसून डॉक्टर, नर्स किंवा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करत असेल तर तो हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.”
डॉ. मंगेश पाटे, डोंबिवली.