
अमेरिकेतील वर्ल्ड फूड प्राईज फाऊंडेशनच्या वतीने २० ते २२ ऑक्टोबरदरम्यान आयोजित केलेल्या ‘ग्लोबल युथ इन्स्टिट्यूट (जीवायआय) २०२६’ साठी नवी मुंबईतील बारावीत शिकणारा नागप्पन एन. या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. तो कोपरखैरणे येथील रिलायन्स फाऊंडेशन स्कूलमध्ये शिकत असून जागतिक पातळीवर ‘अन्न प्रणाली आणि पोषण सुरक्षा’ या विषयावर होणाऱ्या परिषदेत नागप्पन हा हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
अमेरिकेतील डेस मोईन्स येथे जीवायआय परिषद होत असून त्यात अन्न आणि पोषण सुरक्षा, टिकाऊ शेती, शेतीमधील नव्या कल्पना अशा विविध विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चा होणार आहे. त्यात जगभरातील तरुण सहभागी होत आहेत. नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सेसद्वारे घेण्यात आलेल्या सर्व कसोट्यांवर नागप्पन एन. हा विद्यार्थी यशस्वी झाला.
आता तो अमेरिकेत होणाऱ्या ‘ग्लोबल युथ’ मध्ये आपला संशोधनपर निबंध सादर करणार आहे. तसेच जागतिक स्तरावरील वैज्ञानिक, शेतीविषयक तज्ज्ञ यांच्याशीदेखील त्याला संवाद साधता येईल. रिलायन्स फाऊंडेशन स्कूलच्या शिक्षिका डॉ. उषा गंगावारापु यांनी नागप्पन याला मार्गदर्शन केले आहे.






























































