सातारा-सोलापूर मार्गावरील तोतयांच्या लूटमारीचा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गजानन चेणगे 

रात्रीचा गडद काळोख… गाडीच्या प्रकाशाने अंधाराला दुभंगत राज्य महामार्गावरून धावणारी वाहने… त्यातच अचानक रस्त्यावर बॅरेगेटिंगचे अडथळे उभारून ‘अटेन्शन मोड’मध्ये थांबलेला पोलिसांचा फौजफाटा… असे दृश्य नेहमीच प्रवासात पाहायला मिळते. मात्र, हुबेहूब असाच हा नाकाबंदीचा देखावा करून वाहनधारकांना अडवून व कारवाईची भीती दाखवून पैसे उकळणारा ‘फौजफाटा’ चक्क तोतयांचाच निघाला. सातारा-सोलापूर राज्य महामार्गावर तोतयांनी चालवलेल्या या लूटमारीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी एकूण सातजणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी दोन चारचाकी, 8 मोबाईल व रोखरक्कम असा एकूण 21 लाख 19 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींमध्ये चार पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.

विकास दत्तात्रय शिंदे (वय 24, रा. दत्त वसाहत, ता. वाळवा, जि. सांगली), वैभव पांडुरंग पवार (वय 33), राहुल सुनील पाटील (वय 28, दोघे रा. इनामधामणी, ता. मिरज, जि. सांगली), केतन बाबासाहेब महाजन (वय 33, रा. शामरावनगर, ता. मिरज, जि. सांगली), प्रियंका रणदीप नाईक (वय 32, रा. दत्तनगर, शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), प्रियंका संजय भोरे (वय 35, रा. मंगळवार पेठ, मिरज, जि. सांगली), अरुणा दयानंद आवळे (वय 41, रा. महिशाळ वेस, मिरज, जि. सांगली) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. सोमवारी (दि. 13) मध्यरात्री सातारा-सोलापूर मार्गावरील वर्धनगड (ता. खटाव) गावच्या हद्दीत असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर बॅरेगेटिंग लावून खाकी व खासगी गणवेशातील लोक वाहने अडवून पैसे घेत असल्याची माहिती सहायक निरीक्षक नागनाथ खुणे यांना मिळाली. त्यांनी त्वरित पथकासह छापा टाकला, तेव्हा तेथे नायरा पेट्रोल पंपाच्या पुढील बाजूस रस्त्यावर

बॅरेगेटिंग लावून सहा ते सात पुरुष व महिला रस्त्यावर थांबलेले दिसले. यावेळी खरे पोलीस पाहून भामटे पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

आरोपीतील काहींनी पोलिसांचा वेश परिधान केला होता, तर काही सिव्हिल ड्रेसमध्ये होते. त्यांना आपण कोठे नेमणुकीस आहात, याबाबत चौकशी पोलीस खात्यात नोकरीला नसल्याचे त्यांनी सांगितले. सफारी व स्विफ्ट डिझायर गाडीतून येथे आलो असल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नागनाथ खुणे, हवालदार योगेश बागल, रेश्मा भोसले, अशोक सरक, कॉन्स्टेबल राहुल जाधव, उमेश देशमुख, दयाबा नरळे, तुषार बाबर यांनी ही कारवाई केली. कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे जिल्हा पोलीसप्रमुख निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी अभिनंदन केले आहे.

धमकावून 500 रुपये घेतले

बॅरेगेटिंग लावलेल्या ठिकाणी आरोपींनी अडवलेले ऋषिकेश बाबासा शिरतोडे (रा. नागनाथवाडी, ता. खटाव) व सूरज लहुकुमार शिरतोडे (रा. ललगुण, ता. खटाव) हे दोघे थांबले होते. खऱ्या पोलिसांना आलेले पाहून त्यांना हायसे वाटले. त्यातील ऋषिकेश शिरतोडे याने आरोपींनी त्यांची दुचाकी थांबवून ‘आम्ही पोलीस आहे,’ असे म्हणून ‘तुम्ही रात्रीचे का फिरताय? तुमच्यावर कारवाई करतो, कारवाई करायची नसेल तर 500 रुपये द्यावे लागतील,’ असे सांगितले होते. आम्ही गावावरून आल्याचे सांगितले तरी आमच्याकडून 500 रुपये घेतल्याचे सांगितले.