
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याचा खळबळजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे मंदिरात सुरू असलेल्या संवर्धन कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या व्हिडीओनंतर भाविकांनी संताप व्यक्त केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मंदिरात गळती सुरू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गळतीमुळे पावसाचे पाणी मंदिरातील खांबांवरून आणि मार्गांवर टिपकत असल्याचे समोर आले. संपूर्ण मंदिरातील अंतर्गत आणि बाह्य नक्षीकाम, विविध कलाकुसर, मूर्तींचे मूळ रूप जतन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कामात ग्राइंडरचा वापर केला जात आहे. या कामांमुळे मंदिरात गळती लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कामांमुळे मूळ सौंदर्य असलेल्या दगडी रचनेला धोका निर्माण होण्याची भीती भाविकांनी व्यक्त केली आहे. या गळतीबाबत देवस्थान समितीने कोणतीही अधिकृत माहिती अथवा स्पष्टीकरण दिलेले नाही.
भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण
याबाबत माहिती मिळताच भाविकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी आज मंदिराची पाहणी केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओची सत्यता पाहून प्रशासन व पुरातत्त्व विभागाला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.































































