
>> मंगेश वरवडेकर
पहिल्या प्रेमाची बातच न्यारी. आयुष्यात कितीही नवी माणसं आली, नवे ऋतू आले, नवे रस्ते सापडले तरी पहिल्या प्रेमाची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पहिलं प्रेम कुणीही विसरू शकत नाही. फुटबॉलचंही तसंच आहे. कितीही नवे देश उगवले, नवी तंत्रज्ञानं आली, डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीपीएस जॅकेट, ड्रोन कॅमेरे आले… तरी वर्ल्ड कपचा खरा रोमान्स एका संघर्षातच दडलेला असतो, तो म्हणजे–युरोप विरुद्ध लॅटिन अमेरिका! आताही प्रत्येक फुटबॉलप्रेमीच्या मनात अलगद हीच इच्छा डोकावलीय.
कुणी काहीही म्हणो, ही दोन खंडं आमने सामने आली की वर्ल्ड कपचा ताप दोन नव्हे, पाच अंशांनी वाढतो. जणू अटलांटिक महासागराच्या दोन्ही किनाऱ्यांवरून दोन आरमारं निघतात आणि मधोमध एका झळाळत्या ट्रॉफीसाठी तोफा डागू लागतात. म्हणजे खेळ रंगतोच, पण त्याला युद्धाची झळाळी मिळते.
सकाळी लेख वाचेपर्यंत फ्रान्स आणि स्पेन यांच्यातली उपांत्य लढत झालेली असेल. एक युरोपियन दादा संघ अंतिम फेरीत पोहोचलाही असेल. मग आज मंगळवारी मध्यरात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात युद्ध पेटेल. या दोन्ही उपांत्य लढतीत निकाल काहीही लागू शकतो. स्पेन आणि इंग्लंड जिंकले तर न्यूयॉर्क-न्यू जर्सीमध्ये युरोपियन कौटुंबिक मेळावा भरेल. फ्रान्स आणि इंग्लंड आले तरी तोच प्रकार पाहायला मिळेल, पण मनाच्या एका कोपऱ्यात मात्र करोडो फुटबॉलप्रेमी एकच प्रार्थना करत आहेत, फायनलमध्ये अर्जेंटिना असू दे! कारण त्याच्याशिवाय फायनलला ‘ती’ चव येणारच नाही.
वर्ल्ड कपचा इतिहासच ते सांगतोय. 22 फायनल्सपैकी तब्बल 11 फायनल्स युरोप विरुद्ध लॅटिन अमेरिका अशा रंगल्या आहेत. म्हणजे प्रत्येक दुसरी फायनल दोन खंडांच्या संघर्षाची होती. नऊ फायनल्स पूर्ण युरोपियन झाल्यात. म्हणजे दोन्ही संघ युरोपातलेच होते. फक्त दोन वेळा लॅटिन अमेरिकेचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. ही आकडेवारीच सांगते की, वर्ल्ड कपची सर्वात लोकप्रिय पटकथा कोणती आहे. का बरं? युरोपियन प्रशिक्षक फुटबॉलला इंजिनीअरिंग कॉलेजात घालतात. लॅटिन अमेरिकन आई मात्र त्याला चड्डी घालायच्या आधी चेंडू लाथाडायला शिकवते. त्यामुळे एकीकडे फुटबॉल कॉम्प्युटरसारखा विचार करतो, तर दुसरीकडे गिटारसारखा वाजतो. युरोपियन खेळाडूंचा प्रत्येक पास हा गणिताचा फॉर्म्युला असतो. लॅटिन अमेरिकन खेळाडूची प्रत्येक ड्रिबल ही कविता असते. बोले तो, युरोपमध्ये फुटबॉल प्रयोगशाळेत जन्मतो. लॅटिन अमेरिकेत तो धुळीच्या मैदानावर, समुद्रकिनारी, झोपडपट्टीत आणि गल्लीत वाढतो. म्हणजेच एका बाजूला बुद्धिबळ अन् दुसऱया बाजूला नृत्य. गंमत म्हणजे दोघांचं अंतिम ध्येय गोलच असते.
हे पहिलं प्रेम भेटलं की आपोआप पाऊस पडतो, विजांचा कडकडाट होतो. 1958 मध्ये पेलेने युरोपला चकित केलं. 1970 मध्ये ब्राझीलने जगाला सौंदर्याची नवी व्याख्या दिली. 1986 मध्ये मॅराडोनाने इंग्लंडला इतिहासाचा सर्वात वेदनादायी धडा शिकवला. 1994 मध्ये ब्राझील आणि इटलीने श्वास रोखायला लावला. 2002 मध्ये रोनाल्डोने जर्मनीचा किल्ला पाडला. 2014 मध्ये जर्मनीने अर्जेंटिनाचं स्वप्न मोडलं. आणि 2022 मध्ये मेस्सी आणि एम्बाप्पेने असा अंतिम सामना रंगवला की तो पाहताना वेळही थांबली होती. प्रेक्षकांचे श्वासही रोखले गेले होते. या फायनल्स आठवल्या की सारे स्कोअर विसरतात. त्यांना कथा आठवतात. पेले आठवतो, मॅराडोना आठवतो, झिदान आठवतो, रोनाल्डो आठवतो, मेस्सी आठवतो. कारण वर्ल्ड कप हा आकडेवारीपेक्षा आठवणींचाच खेळ आहे.
यंदाही न्यूयॉर्क-न्यू जर्सीच्या स्टेडियममध्ये जगाची नजर एका प्रश्नावर खिळली आहे की फायनलला कोण? दोन युरोपियन संघांची फायनल म्हणजे पंचतारांकित हॉटेलमधलं सात पदार्थांचं जेवणच. चूक नसते, पण तिखटही नसतं. युरोप विरुद्ध लॅटिन अमेरिका म्हणजे? अहो, ते कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सासारखं! डोळ्यात पाणी येतं, पण हात थांबत नाही. म्हणूनच वर्ल्ड कपचं खरं सौंदर्य केवळ चषकात नसतं. ते त्याच्यासाठी भिडणाऱ्या दोन जगांत असतं.
फिफाने कितीही संघ वाढवले, कितीही नवे देश आणले, नियम बदलले, पण वर्ल्ड कपच्या पटकथेचा आवडता नायक अजूनही तोच आहे. युरोप विरुद्ध लॅटिन अमेरिका. जणू बॉलीवूडने कितीही विज्ञानपट काढले तरी शेवटी प्रेक्षकांना अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’च हवा असतो. न्यूयॉर्कच्या गगनचुंबी इमारतींनाही कदाचित अर्जेंटिनाचा झेंडा आणि युरोपचा अभिमान एकाच मैदानावर डोलताना पाहायचाय. अशा सामन्यात स्टेडियमची केवळ आसनं भरत नाहीत, इतिहास भरतो. फायनलला त्याची साक्ष मिळेल. जगात नेहमीच पहिल्या गोष्टीला मान असतो. तस्संच पहिल्या प्रेमाचाही मान असतो. म्हणूनच फुटबॉलप्रेमी देवाकडे ट्रॉफी कोणाला मिळेल याची प्रार्थना करत नाहीत. ते एवढंच म्हणतात, देवा, फायनलला एक युरोपियन आणि एक लॅटिन अमेरिकन संघ ठेव. पुढचं आम्ही बघून घेऊ!




























































