
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावी पुनर्परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. त्यात दहावीचा 29.53 टक्के तर बारावीचा 38.72 टक्के निकाल लागला आहे. दहावीच्या विभागनिहाय निकालात नाशिक विभागाने 41.45 टक्के निकालासह प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर बारावीत छत्रपती संभाजीनगर विभागाने 52.90 टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी 51,313 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 15,157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीच्या विभागनिहाय निकालात नाशिक विभागाने बाजी मारली आहे. त्याबरोबर लातूर विभागाचा 34.55 टक्के, छत्रपती संभाजीनगर 34.27, नागपूर निकाल 39.42, अमरावती 30.36, पुणे 23.99, कोल्हापूर 18.53, मुंबई 17.73 तर कोकण विभागाचा सर्वात कमी 12.26 टक्के निकाल लागला.
बारावीच्या परीक्षेसाठी 1,02,040 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 39,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीच्या विभागनिहाय निकालात छत्रपती संभाजीनगर विभागाने बाजी मारली. त्याचबरोबर लातूर विभागाचा निकाल 46.53 टक्के, नाशिक 42.01, अमरावती 37.70, नागपूर 36.61, पुणे 36.97, कोल्हापूर 35.22, मुंबई33.22 आणि कोकण विभागाचा 20.90 टक्के निकाल लागला.






























































