कोकण रेल्वेच्या नोकरभरतीत प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना न्याय द्या! रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण रेल्वेच्या नोकरभरतीत प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसह कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने कोकण रेल्वेचे ऑपरेशन संचालक सुनील गुप्ता, मुख्य कार्मिक अधिकारी मनोजकुमार आणि एसपीओ नागराजन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यत्वे नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेबाबत चर्चा झाली. प्रक्रियेंतर्गत पॅनेलमधून पाच उमेदवार अद्याप भरावयाचे बाकी असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. त्यावर योग्य कार्यवाही लवकर पूर्ण करुन सर्व जागा भरल्या जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना उपनेते दिवाकर देव व कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेतली. यावेळी रत्नागिरी विभागातील 13 कामगारांच्या एमएसीपीबाबत संजय जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधित निर्णय पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप केला. सर्व 13 कामगारांचे पूर्ण सर्व्हिस बुक डीओ यांनी स्वतः तपासावे, 2024 च्या पदोन्नती यादीत नाव आले, मग 2025 मध्ये 13 नावे पुन्हा वगळण्यात का आली? अधिकाऱयांनी त्यांच्या अधिकाराचा योग्य वापर केला की अन्य युनियनच्या दबावाखाली निर्णय घेतला? असा प्रश्नांचा भडिमार शिष्टमंडळाने केला. याप्रसंगी संघटनेच्या कोकण रेल्वे युनिटचे सरचिटणीस राजू सुरती, संयुक्त सरचिटणीस जयसिंग देशमुख, मिनाज झारी, नागराज, शमी दादरकर, प्रशांत जाधव, संतोष हुमणे, विनायक चव्हाण, विल्सन लोबो, गजानन गायकर उपस्थित होते.

भूमिपुत्रांसाठी महत्त्वपूर्ण सूचना

रेल कामगार सेनेने कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांसाठी महत्त्वपूर्ण सूचना केली. एका सर्व्हे नंबरवर एकच जण नोकरीसाठी ग्राह्य धरला जात असल्याने कोकणातील आणेवारी, पोटहिस्सा, काwटुंबिक जमिनीची वाटणी झाल्यानंतर सहहिस्सेदारांना (जमीन अधिग्रहणाचा तहसीलदारांचा दाखला असलेले) नोकरीसाठी ग्राह्य धरत स्पर्धा परीक्षेसाठी योग्य समजावे, जर उमेदवार सर्व परीक्षेच्या पायऱ्या उत्तीर्ण होत असेल तर एका सर्व्हे नंबरवर अनेक हिस्सेदार नोकरीसाठी पात्र ठरवा, प्रकल्पग्रस्तांसाठी परीक्षा पॅटर्न सोपा असावा, अशी सूचना शिष्टमंडळाने केली.