
जुलैच्या सुरुवातीला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठा 50 टक्क्यांवर गेला. मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढलेला नाही. सद्यस्थितीत सातही धरणांमध्ये 50 टक्केच पाणी जमा आहे. यामुळे मुंबईत सुरू असलेल्या दहा टक्के पाणीकपात रद्दचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 4,100 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. त्यामुळे धरणक्षेत्रात होणाऱ्या पावसाकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलेले असते. दरम्यान, 20 जुलैनंतरच राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आल्यामुळे धरणक्षेत्रात होणाऱ्या पावसावर मुंबईतील पाणी पुरवठय़ाचे नियोजन ठरणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांची तूट
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांत गेल्या वर्षी 15 जुलै रोजी 1133347 दशलक्ष लिटर म्हणजेच 78.30 टक्के जलसाठा जमा होता.
मात्र या वर्षी 719716 दशलक्ष लिटर म्हणजेच 49.73 टक्के पाणी जमा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे पाणी सुमारे 30 टक्क्यांनी कमी जमा आहे.
सध्याचा जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा 65294 28.76 टक्के
मोडक सागर 100356 77.84 टक्के
तानसा 113174 78.01 टक्के
मध्य वैतरणा 85616 44.24 टक्के
भातसा 319659 44.58 टक्के
विहार 27698 100 टक्के
तुळशी 7920 98.43 टक्के































































