
मुसळधार पावसानंतर मुंबईकर तापाने बेजार झाले आहेत. मुंबई डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या विळख्यात सापडली आहे. पालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सध्या चार हजारांवर रुग्ण विविध रुग्णालयांत आणि दवाखान्यात साथीच्या आजारांवर उपचार घेत आहेत. दरम्यान, पालिकेने जानेवारीपासून आतापर्यंत केलेल्या नोंदीनुसार मुंबईत डेंग्यूचे 938, मलेरियाचे 3689 तर गॅस्ट्रोचे तब्बल 3866 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी दूषित पाणी साचल्याने आणि अस्वच्छतेमुळे लेप्टोस्पायरोसिस बाधितांची संख्या वाढली आहे. लेप्टोस्पायरोसिसचे तब्बल 157 रुग्ण आढळल्याने धोका वाढल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे लेप्टोचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे. शिवाय जून-जुलैमध्ये ‘स्पेशल कन्स्ट्रक्शन ड्राइव्ह’ राबवून तीन हजार बांधकाम ठिकाणच्या 54 हजार 763 कामगारांचे रक्त नमुने घेतले आहेत. यामध्ये 37 रुग्ण मलेरियाचे आढळले.
मुंबईत सध्या चिकुनगुनियाचे 31, कोविडचे 71 तर स्वाईन फ्लूचे 71 रुग्ण आहेत.
अशी घ्या काळजी
- घर, घराच्या परिसरात डासांच्या वाढीला पोषक ठरणारे पाणी साचू देऊ नका.
- जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळय़ा, प्लॅस्टिकच्या वस्तू अडगळीत साचवू नका.
- झोपताना किंवा दिवसा डास प्रतिबंधक औषधांचा वापर नियमितपणे करीत रहा.
- ताप आल्यास पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह ‘आपला दवाखाना’मध्ये संपर्क साधा.





























































