वसईच्या कोळीवाड्यांना मिळणार गावठाणाचा दर्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसई तालुक्यातील कोळीवाड्यांना आता अधिकृत गावठाणे म्हणून दर्जा मिळणार आहे. त्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. यामुळे या कोळीवाड्यांतील नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांना भेडसावणारे प्रश्न वेगाने सोडवता येणार आहेत.

वसईच्या कोळीवाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यासंदर्भात महसूलमंत्री बावनकुळे यांनी संबंधित लोकप्रतिनिधी आणि विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात बोलवली होती.

गावठाणे तसेच कोळीवाडय़ातील रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरांची मालकी मिळवून देण्यासाठी तिथल्या घरांखालील जमिनी संबंधित रहिवाशांच्या नावे करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, असे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले. तेथील काही रहिवाशांच्या जमिनींचा हक्क मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडे आहे. त्यासंदर्भात लवकरच पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणासोबत स्वतंत्र बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल, अशी ग्वाहीसुद्धा बावनकुळे यांनी दिली.

2011 पूर्वीची बांधकामे नियमित करणार

1 जानेवारी 2011 पूर्वीची 1500 चौरस फुटांपर्यंतची निवासी बांधकामे नियमित करण्यात यावीत, मात्र या मुदतीनंतर झालेली अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यात यावीत. कोळीवाड्यांना गावठाणे म्हणून घोषित करण्यापूर्वी संबंधित कोळीवाड्यांचे योग्य सीमांकन करून भूमी अभिलेख विभागामार्फत त्यांची तातडीने मोजणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.