कोस्टल रोडच्या बोगद्यात बर्निंग कार; ऐन गर्दीच्या वेळी अपघात… घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईचा प्रवास अधिक वेगवान बनवणाऱ्या कोस्टल रोडच्या बोगद्यात बुधवारी दुपारी धावत्या कारने पेट घेतल्यामुळे एकच हलकल्लोळ उडाला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीमुळे संपूर्ण बोगद्यात तासभर धुराचे साम्राज्य निर्माण झाले आणि वाहनधारकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. यादरम्यान अनेकांनी बोगद्यात गाडय़ा सोडून देत पळापळ केली. यावेळी वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याने मुंबईकडे चाललेल्या शेकडो गाड्यांचा खोळंबा झाला. कोस्टल रोड ते हाजी अलीदरम्यान जवळपास आठ किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

कोस्टल रोड बोगद्याच्या उत्तरेकडील भागात धावत्या कारने अचानक पेट घेतला. कारमधून धूर आणि वास येऊ लागल्यानंतर चालकाने तत्काळ गाडी थांबवली. आतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तातडीने बाहेर उडय़ा मारल्या. नंतर पुढच्या काही क्षणांतच कारला भीषण आगीने वेढले. आगीमुळे बोगद्यात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. यादरम्यान काही वाहनधारकांनी इतरांना सावध करण्यासाठी आरडाओरडा करीत सैरावैरा पळापळ सुरू केली. त्यामुळे बोगद्यात प्रचंड घबराट पसरली होती. आगीच्या घटनेनंतर संपूर्ण मार्गिकेवरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे शेकडो वाहनांचा खोळंबा झाला होता. आगीचे वृत्त समजताच पोलीस व अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू करण्यात आले. आग पूर्णपणे विझेपर्यंत कोस्टल रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. हाजी अली व वरळी परिसरात वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. या काळात परिसरातील इतर मार्गांवर जागोजागी वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते. याचा दक्षिण मुंबईत जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.

अनेकांनी गाडय़ा जागीच सोडून पळ काढला

बोगद्याच्या मधल्या भागातच शेकडो गाडय़ा अडकून पडल्या. ‘पुढे आग लागली आहे.. पळा पळा…’ असा आरडाओरडा करीत अनेकांनी आपल्या गाडय़ा जागीच सोडून पळ काढला, तर काही वाहनधारकांनी ‘यू टर्न’ घेत उलटय़ा दिशेने गाडय़ा पळवल्या. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही वाहतूककोंडी, धूर आणि गोंधळातून घटनास्थळापर्यंत पोहोचणे मुश्कील बनले. सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

अग्निसुरक्षेबाबत वाहनचालकांना चिंता

कोस्टल रोडचा बोगदा जवळपास चार किलोमीटर लांब आहे. एवढय़ा मोठय़ा लांबीच्या बोगद्यात अग्निसुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली नाही. बोगद्यात आगीवर वेळीच नियंत्रण मिळवणे मुश्कील असल्याने वाहनधारकांकडून सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेने कोस्टल रोडच्या बोगद्यातील आपत्कालीन यंत्रणांचा अभाव तसेच अनेक वाहनधारकांचे बेशिस्त वर्तन उघडकीस आले. विशेष म्हणजे, एका लोकप्रतिनिधीनेदेखील वाहतूक कोंडीतच पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.