
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानला 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासोबतच इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात हिंदुस्थानचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 26 धावांवर बाद झाल्याने त्याच्या फॉर्मवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच तो लॉर्ड्सवर आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी उतरेल अशीही चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे हिंदुस्थानी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक शितांशू कोटक यांनी मात्र रोहित शर्मा कोणत्याही दबावाखाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रोहित शर्मासारख्या दर्जेदार खेळाडूवर कोणत्याही प्रकारचा दबाव येईल, असे मला वाटत नाही. तो अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. पहिल्या दोन सामन्यांत त्याला मोठी धावसंख्या उहिंदुस्थान आली नसली, तरी त्याने काही फरक पडत नाही. दुसऱ्या सामन्यात तो एक मोठी खेळी खेळणार असे वाटत होते, पण दुर्दैवाने तो बाद झाला, असे सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोटक म्हणाले.
रोहित सहसा चेंडूच्या रेषेत येऊन शॉट्स खेळतो. पण या खेळपट्टीवर चेंडू थांबून आणि दुहेरी उसळी घेऊन येत होता. त्यामुळे कदाचित त्याला मोठे शॉट्स खेळताना अडचण आली असावी. मी यासाठी संघर्ष हा शब्द वापरणार नाही, असे कोटक म्हणाले.
मी खूप क्रिकेट खेळलो आणि पाहिले आहे. अनेकदा चांगल्या फलंदाजांनाही सुरुवातीला हवी तशी लय मिळत नाही. शुभमन गिल आणि विराट कोहलीला पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली, त्यामुळे ते स्थिरावले. रोहितला तशी सुरुवात मिळाली नाही. पण रविवारच्या लॉर्ड्सवरील अंतिम सामन्यात तुम्हाला रोहित शर्माची एक पूर्णपणे वेगळी आणि उत्कृष्ट खेळी पाहायला मिळू शकते, असे कोटक म्हणाले.
यावेळी त्यांनी संघाच्या कामगिरीवरही भाष्य केले. एकवेळ विराट खेळत असताना हिंदुस्थानची स्थिती 3 बाद 178 अशी भक्कम होती. पण त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला आणि बाद झाला. पाठोपाठ अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांच्या विकेट्स लागोपाठ गेल्याने मोठा फरक पडला. आम्ही 270-280 धावांपर्यंत पोहोचलो असतो, तर हे आव्हान कठीण ठरले असते, असेही ते म्हणाले. तसेच दुसऱ्या डावात खेळपट्टी संथ झाली आणि इंग्लंडच्या जो रूटने 99 धावांची नाबाद मॅच-विनिंग खेळी केली. जर आम्ही रूटला लवकर बाद करू शकलो असतो, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असेही कोटक म्हणाले.
IND vs ENG ODI – इंग्लंड विजयी ‘रूट’वर, हिंदुस्थानचा 4 गडी राखून पराभव; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

























































