
नंदुरबार जिह्यातील होल मोहिदा येथे घरात घुसलेल्या बिबट्याने मायलेकाला जखमी केले. तरीही न डगमगता प्रतिकार करून आईने बिबट्याला कोंडून आपल्या छोट्या दोन मुलांचा जीव वाचवला.
शहादा तालुक्यातील होल मोहिता येथे वैशाली भामरे (27) बुधवारी रात्री आठच्या सुमारास घरातील काम आवरत होत्या. मुख्य दरवाजा उघडा असल्याने अचानक बिबट्या आत घुसला. त्यावेळी बाजेवर त्यांची दोन लहान मुले खेळत होती. वैशाली यांनी प्रसंगावधान राखून दोन्ही मुलांना कडेवर उचलून बाहेर धाव घेतली. यावेळी बिबट्याने झडप घालून वैशाली व एका मुलाला जखमी केले. बिबट्याचा प्रतिकार करून वैशाली यांनी सुटका करून घेतली, वेळ न दवडता दरवाजा बंद करून बिबट्याला आत कोंडले. याची ग्रामस्थांकडून माहिती मिळताच वनविभागाचे पथक व वन्यजीव रक्षक समितीचे सदस्य गावात दाखल झाले. तीन तासात त्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.
दोन हल्ल्यात पाच जखमी
या बिबट्याने तालुक्यातील जुनवणे परिसरात सकाळी तिघांवर हल्ला केला होता. ते तिघे व होल मोहिता येथील मायलेक अशा पाच जणांवर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



























































