मोस्ट वॉन्टेड गँगस्टर नितीन कौशलला अमेरिकेत अटक, FBI ने व्हर्मोन्ट राज्यातून ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत खून, अपहरण आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या नितीश कौशल या हिंदुस्थानी गँगस्टरला एफबीआयने व्हर्मॉन्ट राज्यातून अटक केली आहे. एफबीआयने त्याचा समावेश मोस्ट वॉन्टेड यादीत केला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एफबीआयने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करून या अटकेची माहिती दिली.

नितीश कौशल हा मूळचा हिंदुस्थानी नागरिक असून तो जग्गू भगवानपुरिया संघटित गुन्हेगारी टोळी या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेटचा सक्रिय सदस्य आहे. तो या टोळीच्या सांगण्यावरून अपहरण, प्राणघातक हल्ले आणि इतर हिंसक कृत्ये करत असल्याचा आरोप आहे. ही गुन्हेगारी टोळी मूळची हिंदुस्थानमधील पंजाब राज्यातील असून, सध्या ती अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा मध्यवर्ती भाग आणि इतर देशांमध्ये आपले नेटवर्क चालवत आहे, अशी माहिती एफबीआयने दिली आहे.

नितीश कौशल खून, खंडणी, शस्त्रास्त्रांची तस्करी, मनी लाँड्रिंग आणि मानवी तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचा संशय आहे. 25 जून रोजी लॉस एंजेलिस येथील कॅलिफोर्नियाच्या मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाने त्याच्याविरुद्ध फेडरल अटक वॉरंट जारी केले होते. त्याच्यावर रॅकेटियर इन्फ्लुएन्स्ड अँड करप्ट ऑर्गनायझेशन्स कायद्यांतर्गत कट रचल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, नितीन कौशलची ही अटक ऑपरेशन हार्ड बॉल या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय मोहिमेचा भाग आहे. या मोहिमेत अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले.