
किरकोळ वादातून दोन भावांनी आपल्या मित्राचीच खर्डी येथे निघृण हत्या करून त्याचे मुंडके छाटले. एवढेच नव्हे तर दोन्ही हात तोडले. हत्या करणारे एवढे निर्दयी होते की, त्यांनी हा मृतदेह ओळख पटू नये म्हणून निर्जनस्थळी फेकून दिला. मुंब्यातील या क्रूर घटनेचे तब्बल सहा महिन्यांनी गूढ उकलले असून पोलिसांनी हत्येप्रकरणी रिक्षाचालकासह त्याच्या भावालाही अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्या आणि मृताची विल्हेवाट लावल्याचे व्हिडीओ शूटिंग मारेकऱ्यांनी केले. हा व्हिडीओ पोलिसांनी जप्त केला आहे.
फैज मालीम हा रिक्षाचालक असून त्याच्या भावाचे नाव अलबान मालीम असे आहे. त्यांचा अमन शेख हा मुंब्यातील श्रीलंका कंपाऊंड येथे राहणारा मित्र होता. या मित्राशी काही कारणांमुळे वाद झाल्याने १३ मार्च रोजी रात्री उशिरा अमन याला रिक्षातून निर्जनस्थळी नेले. तेथे धारदार चाकूने त्याचा गळा चिरला व मुंडके धडापासून वेगळे केले. दोन्ही हात कापले, शरीराचे अन्य अवयव वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले. हा मृतदेह फैज व अलबान यांनी सुनसान ठिकाणी फेकला.
उल्हासनगर क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असलेल्या पथकाला सुगावा लागताच त्यांनी फैज मालीम व अलबान मालीम या दोघा भावांना अटक केली आहे. फैज याच्यावर यापूर्वीही अपहरण, खून, मारहाण असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा मृत मित्र अमन शेख याच्यावरदेखील दोन मोटारसायकली चोरीचा गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली



























































