IND vs ENG ODI – इंग्लंड विजयी ‘रूट’वर, हिंदुस्थानचा 4 गडी राखून पराभव; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात कार्डिफच्या सोफिया गार्डन मैदानावर दुसरा एकदिवसीय सामना रंगला. या लढतीत जो रूटच्या नाबाद 99 धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने हिंदुस्थानवर 4 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. हिंदुस्थानने विजयासाठी दिलेले 234 धावांचे आव्हान इंग्लंडने 44.1 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. सलामीवीर बेन डकेट याला जसप्रीत बुमराहने शून्यावर, तर जेकब बेथेल याला प्रसिध कृष्णाने 4 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर कर्णधार ब्रूकही 16 धावा काढून बाद झाला. गुरनूर ब्रारने यष्टीरक्षक ईशान किशनकरवी त्याला झेलबाद केले.

एका बाजुने विकेट जात असताना अनुभवी खेळाडू जो रूट याने नांगर टाकला आणि मधल्या फळीतील फलंदाजांसोबत छोट्या छोट्या भागिदारी करत संघाला विजयाजवळ पोहोचवले. या दरम्यान सॅम करन 26, जोस बटलर 17 आणि विल जॅक्स 30 धावा काढून बाद झाले. रूट शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याने 133 चेंडूत नाबाद 99 धावांची खेळी केली. हिंदुस्थानकडून गुरनूर ब्रारने सर्वाधिक 2, तर बुमराह, प्रसिध कृष्णा, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानला कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली होती. गिल 31 धावा काढून बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी जमली. दोघांमध्ये अर्धशतकीय भागिदारी झाली. मात्र जॅक्सला स्विप मारताना रोहित बाद झाला. त्याने 26 धावा केल्या.

दुसऱ्या बाजुने विराट कोहली अर्धशतक पूर्ण केले. मात्र तो 65 धावांवर बाद झाल्यानंतर हिंदुस्थानचा डाव पत्त्यांप्रमाणे कोसळला. श्रेयस अय्यरने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. त्याने 66 धावा केल्या. तर बुमराहने 13 चेंडूत 20 धावांची तुफानी खेळी केली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि गुस एटकिसन यांनी सर्वाधिक 3 गडी बाद केले, तर साबिक महमूद याने 2, सॅम करन आणि विल जॅक्स प्रत्येकी 1 गडी बाद केला.