
गाडीवर ‘भारत सरकार’ अशी पाटी आणि भाजपचा झेंडा लावून गुटख्याची तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तलासरीच्या पोलिसांनी सापळा रचून त्याचा भंडाफोड केला असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या तस्करीत एका अल्पवयीन मुलाचादेखील समावेश आहे. गुजरातहून तलासरामार्गे हा गुटखा महाराष्ट्रात आणला जात होता. पोलिसांनी २० लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला असून व्हॅगनर व इनोव्हादेखील जप्त केली आहे. गुटख्याच्या या तस्करीमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
गुजरातमधून महाराष्ट्रात चरस, गांजा, एमडी पावडर, दारू, गुटखा याची तस्करी मोठ्या प्रमाणावर नेहमी होते. पण आता हद्द झाली असून या तस्करीसाठी चक्क सत्ताधारी भाजपचे चिन्ह, झेंडा आणि ‘भारत सरकार’ नावाची पाटी याचादेखील सर्रासपणे वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. गुजरामधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटखा दोन गाड्यांमधून आज पहाटेच्या सुमारास येणार असल्याची माहिती तलासारीच्या पोलिसांना मिळाली होती. त्याच्या आधारे महामार्गावरील तलासरीच्या हद्दीत सापळा सापडला आहे.
संशयास्पद व्हॅगनार कार आणि चंदेरी रंगाची इनोव्हा कार दिसताच पोलिसांनी ती थांबवली. तसेच या दोन्हीं गाड्यांची झडती घेतली असता आतमध्ये गोण्यांमध्ये लपवलेल्या सुगंधी गुटख्याच्या गोणी आढळून आल्या. त्य सर्व ताब्यात घेतल्या आहेत. एका कारच्या पुढील बाजूस ‘भारत सरकार’ अशी पाटी लावली होती. तर मागच्या बाजूस भाजपचा झेंडा आणि कमळदेखील दिसत होते. या तस्करीप्रकरणी तलासरी पोलीसांनी यशवंत सिंह सलीम शाह, आफताब अन्सारी यांन अटक केली आहे. त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुलगादेखील होता या सर्वांवर आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही गाड्या नेमक्या कोणाच्य मालकीच्या आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नराळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, प्रभारी अधिकारी अजय गोरड, विकास दरगुडे, जयराम उमतोल, राहुल क्षत्रिय, विशाल लोहार, अनिल सोनवणे, रामचंद्र गवळी यांनी केली.



























































