
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. बेरहामपूर परिसरातील कर्णसुवर्ण रेल्वे क्रॉसिंगवर एका ट्रेनने शाळेच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वेच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून रेल्वे गेटमनच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास झाला, जेव्हा ही स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन रेल्वे रूळ ओलांडत होती. त्याच वेळी निमटिटा-कटवा पॅसेंजर ट्रेन तेथून जात होती आणि तिने व्हॅनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रेल्वे रुळावर स्कूल व्हॅनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अप-लाइन ट्रेन जाईपर्यंत रेल्वे क्रॉसिंग गेट बंद होते. ती ट्रेन निघून गेल्यानंतर गेट उघडण्यात आले. मात्र, त्याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवरून दुसरी ट्रेन येत असताना हे गेट पुन्हा बंद करण्यात आले नाही. याच निष्काळजीपणामुळे स्कूल व्हॅन रूळावर आली आणि हा भीषण अपघात घडला. या बेजबाबदारपणामुळे संतप्त नागरिकांनी रेल्वे गेटमनच्या कार्यपद्धतीवर आणि वर्तणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या घटनेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, कटवापासून सुमारे 48 किमी अंतरावर असलेल्या कर्ण सुवर्णा स्टेशनजवळील लेव्हल क्रॉसिंग गेटवर हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी रेल्वे गेटमनच्या कथित निष्काळजीपणासह संपूर्ण दुर्घटनेची औपचारिक चौकशी सुरू करण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

























































