Sonam Wangchuk सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस; डॉक्टरांचा अवयव निकामी होण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे NEET परिक्षेच्या पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज विसावा दिवस असून दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत आहे. गुरुवारी वांगचुक यांना तपासल्यानंतर डॉक्टरांनी डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. आता जर त्यांनी उपोषण सोडले नाही तर दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांचे अवयव निकामी होऊ शकतात अशा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका भावनिक व्हिडिओमध्ये वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. “हे बोलताना वाईट वाटते, पण सोनम वांगचुक मृत्यूच्या दारात उभे आहेत,” असे ते म्हणाले. दिपके यांच्या म्हणण्यानुसार, वांगचुक यांची प्रकृती इतकी खालावली आहे की त्यांच्या शरीरावरील हाडे स्पष्ट दिसत आहेत. गुरुवारी शौचालयाकडे जाताना दोन वेळा त्यांचा तोल गेला, असेही त्यांनी सांगितले. दिपके यांनी सांगितले की, त्यांनी गुरुवारी वांगचुक यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र, वांगचुक यांनी ती ठामपणे नाकारली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्येही वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे दिसून येते. मंचावरून खाली उतरताना त्यांना अभिजित दिपके आणि इतर सहकाऱ्यांचा आधार घ्यावा लागत होता. ते अतिशय संथ आणि अडखळत चालत शौचालयाकडे जाताना दिसले. मात्र, अशा अवस्थेतही त्यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि समर्थकांकडे पाहून स्मितहास्य करत हात हलवून अभिवादन केले.