‘मी 20 जुलैपर्यंत जीवंत राहीन, नाहीतर भूत बनून परत येईन’; सोनम वांगचुक यांचा निर्धार, तब्येत खालावली तरी आंदोलन सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण सुरू आहे. 20 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांचे शरीर अत्यंत थकले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, तरीही त्यांचा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा उपोषणाचा निर्धार कायम आहे.

…तर मी भूत बनून परत येईन

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक राजकीय नेते, कलाकार त्यांची भेट घेत आहेत. यादरम्यान सोनम वांगचुक यांनी जंतरमंतरवर उपस्थिक विद्यार्थी आणि इतर समर्थकांना संबोधित केले. मी 20 जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जीवंत राहीन. मात्र, जर नागरिक या आंदोलनात सहभागी झाले नाहीत आणि 20 तारखेचा मोर्चा यशस्वी झाला नाही तर, मी भूत बनून परत येईन, असे वक्तव्य त्यांनी केले.

वांगचुक यांच्यावर सध्या डॉक्टरांचे पथक सतत लक्ष ठेवून आहे. आपल्या खालावत्या प्रकृतीबाबत बोलताना ते म्हणाले की, माझे शरीर बाहेरून नक्कीच कमजोर झाले आहे, पण मनातून खूप मजबूत आहेत. मला खात्री आहे की आमचे समर्थकही मनातून आणि शरीराने मजबूत आहेत. संसदेवर काढण्यात येणाऱ्या शांततापूर्ण मोर्चासाठी या ऊर्जेची गरज असल्याचे सोनम वांगचुक म्हणाले. जनतेला लोकशाहीच्या मंदिरात एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.

 20 जुलैला संसदेवर भव्य मोर्चा 

या आंदोलनादरम्यान नीट पेपर लीक प्रकरणात कडक कारवाईची सुरुवात व्हावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, ही मुख्य मागणी लावून धरण्यात आली आहे. जंतरमंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचा आज 28 वा दिवस असून या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून 20 जुलै रोजी संसदेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

सोनम वांगचुक यांनी समर्थकांच्या आग्रहाखातर उपोषण मागे घेण्याची विनंती मान्य केली असली, तरी त्यांनी एक महत्त्वाची अट ठेवली आहे. त्यानुसार ते 20 जुलैच्या आंदोलनानंतरच आपले उपोषण अधिकृतपणे सोडणार आहेत. परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पुकारलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.