
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नरवर किल्ल्यातून सशस्त्र गुन्हेगारांनी शिंदे घराण्याची सुमारे 500 वर्षे जुनी तोफ चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धाडसी दरोड्यामुळे किल्ल्याची सुरक्षा आणि पुरातत्व विभागाच्या संवर्धन उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नरवर किल्ल्याच्या खुल्या प्रांगणात एकूण 14 ऐतिहासिक तोफा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या चोरीनंतर आता ही संख्या 13 वर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 आणि 16 जुलैच्या मध्यरात्री 25 ते 30 सशस्त्र दरोडेखोर मागच्या दरवाज्यातून किल्ल्यात घुसले. हे दरोडेखोर आपल्यासोबत क्रेन आणि ट्रकसारखी अवजड यंत्रसामग्री घेऊन आले होते. त्यांनी प्रांगणातील 14 तोफांपैकी 3,000 किलोग्रॅम वजनाची एक अत्यंत मौल्यवान अष्टधातूची तोफ चोरून नेली. घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, हल्लेखोर अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होते. त्यांनी रक्षकांना जीवे मारण्याची धमकी देऊन मागे हटण्यास भाग पाडले. किल्ल्यात पुरेशी प्रकाशयोजना किंवा मशाली देखील नव्हत्या आणि सुरक्षा रक्षकांकडे केवळ काठ्या होत्या, ज्यामुळे ते हतबल झाले.
तपासातून समोर आले आहे की, हे दरोडेखोर पूर्वतयारी करून आले होते. तोफ कुठे ठेवली आहे आणि ती हलवण्यासाठी किती मनुष्यबळ लागेल, याची त्यांना आधीच अचूक माहिती होती. यामुळेच ते मोठ्या संख्येने आणि मालवाहू वाहनासह आले होते. या प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, सुमारे 12 दिवसांपूर्वीच किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूला संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी याबद्दल माहिती दिली होती. त्यानंतरही सुरक्षा वाढवण्याबाबत प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नाहीत.
पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, ही तोफ 16 व्या शतकातील असून ती हिंदुस्थानच्या लष्करी इतिहासाचे आणि त्या काळातील प्रगत धातुरचना तंत्राचे एक उत्कृष्ट प्रतीक आहे. या तोफेवरील वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम आणि ऐतिहासिक खुणा तिला अद्वितीय आणि अत्यंत दुर्मिळ बनवतात. या ऐतिहासिक खजिन्याचे मूल्य पैशात मोजणे अशक्य असले, तरी आंतरराष्ट्रीय अवैध पुरातन वस्तूंच्या बाजारात याची किंमत कोट्यवधी रुपये असू शकते. त्यामुळे या चोरीमागे आंतरराष्ट्रीय तस्करी करणारी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि सायबर सेलच्या मदतीने ऐतिहासिक वस्तूंच्या तस्करीमध्ये सामील असलेल्या नेटवर्कचा कसून तपास केला जात आहे.


























































