मुंबईत दुर्दैवी घटना! कुर्लामधील शीतल तलावात बुडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला पश्चिम येथील शीतल तलावात बुडून एका 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. आदित्य दिलीप तायडे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुख्य अग्निशमन दलाकडून (MFB) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास कुर्ला पश्चिम येथील एल.बी.एस. रोडवर असलेल्या शीतल तलावात एक तरुण बुडाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने मदत व बचाव कार्यासाठी यंत्रणांना पाचारण करण्यात आले. यामध्ये मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, 108 रुग्णवाहिका सेवा, एनडीआरएफ आणि पालिकेच्या स्थानिक वॉर्डचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

दुपारी 2 वाजून 12 मिनीटांनी मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर तलावातून आदित्यला बाहेर काढले आणि उपचारासाठी तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. राजावाडी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य दिलीप तायडे याला रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.