
अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाल्याने आखातातील वातावरणही तापले आहे. अमेरिकेकडून सुरू असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण आखातातील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र डागत आहे. हा तणाव आणखी वाढण्याची चिन्हे असून इराणने कुवेतच्या एका महत्त्वाच्या वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यामध्ये प्रकल्पाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण कुवेतमध्ये पाणी आणि वीज संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
Kuwait says Iran attacked a power and water desalination plant, causing widespread damage to the station, reports AP pic.twitter.com/SKQYjh2hGA
— Press Trust of India (@PTI_News) July 17, 2026
कुवेत हा पूर्णपणे वाळवंटी देश असून येथील तब्बल 90 टक्के पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा समुद्राचे खारे पाणी गोड करणाऱ्या डिसॅलिनेशन प्रकल्पांवरून होतो. त्यामुळे अशा प्रकल्पावर झालेला कोणताही हल्ला किंवा बिघाड या देशातील जनजीवन विस्कळीत होऊ शकते. इराणने आता कुवेतच्या याच प्रकल्पावर निशाणा साधला आहे. कुवेतच्या विद्युत, पाणी आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
इराणच्या या हल्ल्यानंतर प्रकल्पाच्या आवारात मोठी आग भडकली. यामध्ये वीज निर्मिती करणाऱ्या अनेक युनिट्सचे प्रचंड नुकसान झाले आहे, अशी माहिती कुवेतच्या विद्युत, पाणी आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या प्रकल्पातील नुकसानीचा अंदाज घेतला जात असून, पाणी आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे कुवेत प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणमधील चाबहार बंदराचे नुकसान, देखरेखीसाठीचा टॉवर कोसळला





























































