रमेश म्हात्रेचे नगरसेवक पद रद्द करा अन्यथा हायकोर्टात दाद मागणार, तक्रारदार कल्पेश जोशी यांचे पालिका आयुक्तांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटनेनंतर शिंदे गटाचे डोंबिवलीतील कोपर प्रभागाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या प्रकरणातील तक्रारदार कल्पेश जोशी यांनी रमेश म्हात्रे यांच्याविरोधात तातडीने कायदेशीर कार्यवाही सुरू करून नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राजकीय दबावापोटी म्हात्रे यांना वाचवले जात असून याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्य निवडणूक आयोग, कोकण विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी सातत्याने कल्पेश जोशी यांनी अर्ज केले आहेत. मात्र राजकीय दबावामुळे या तक्रारींची गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप कल्पेश जोशी यांनी केला आहे

म्हात्रेंनी उभारली बेकायदा इमारत

रमेश म्हात्रे यांचा मुलगा प्रवीण म्हात्रे याच्याविरोधात जुनी डोंबिवली परिसरातील ‘आरोही हाईट्स’ ही बेकायदा इमारत बांधली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याचाही जोशी यांनी पत्रात उल्लेख केला आहे. कायद्यातील तरतुदीनुसार रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी आयुक्त पुढाकार घेत नसल्याबद्दल जोशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.