
अयोध्येच्या राम मंदिरातील चोरीचे प्रश्नही भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांना सहन होईनासे झाले असून याबाबत जाब विचारणऱ्यांना भाजपचे लोक लक्ष्य करू लागले आहेत. मंदिरातील चोरी आणि देवदेवतांच्या अपमानाबद्दल विचारले म्हणून तेलंगणातील एका भाजप नेत्याने हिंदू साधूवर लाइव्ह शोमध्ये हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे भाजपवर टीकेची झोड उठली आहे.
‘बीआरके न्यूज’ या ‘यूटय़ूब’ चॅनेलमध्ये राम मंदिरातील चोरीच्या विषयावर चर्चा सुरू होती. हिंदूज फॉर प्लुरॅलिटी ऍण्ड इक्वॅलिटी (एचपीई) संघटनेचे सरचिटणीस टीव्ही रामण्णा मूर्ती यात सहभागी झाले होते, तर भाजपच्या वतीने स्थानिक नेता सहभागी झाला होता. मूर्ती यांनी यावेळी देणगी चोरीच्या मुद्दय़ावरून भाजपच्या नेत्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
दशावताराच्या एका पोस्टरमध्ये श्रीकृष्णाच्या चेहऱयावर पंतप्रधान मोदींचा मुखवटा लावण्यात आला होता. त्याबाबतही मूर्ती यांनी जाब विचारला. भाजप नेत्याकडे याचे उत्तर नव्हते. त्यामुळे तो हातघाईवर आला. त्याने थेट चप्पल काढून मूर्ती यांना मारले. चॅनेलच्या अँकरने मध्यस्थी केल्यामुळे हा वाद शांत झाला. वेगवेगळय़ा धार्मिक व सामाजिक संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध केला.




























































