दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश! जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 5 दहशतवाद्यांना अटक, टाईम बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या नेटवर्कचा गुजरात दहशतवादविरोधी पक्षकाने पर्दाफाश केला आहे. गुजरात एटीएसने पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर तालुक्यातील खडियाल गावातून 5 संशयित दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. याआधी अटक करण्यात आलेल्या 8 संशयितांच्या चौकशीतून या 5 जणांची नावे समोर आल्यानंतर एटीएसने ही धडक कारवाई केली.

बिलाल आबिदभाई शेरा, मोहम्मद अयुब काडीवाला (उर्फ मोहम्मद खडियासन), मोहम्मद पालनपुरी (उर्फ खाली अयुब सुणसरा), शफिया रईस मुक्ती (उर्फ शफी चापी) आणि मोहम्मद हसन कारडिया (उर्फ हसन हैदरपुरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या पाचही संशयितांना मेहसाणा जिल्ह्यातील कडी येथील न्यायदंडाधिकारी आर. एम. भाटिया यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

गुजरात एटीएसने अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने टाईम बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्यांचा हा प्रयोग अयशस्वी ठरला, अशी माहिती सरकारी वकील पी. आर. दांताणी यांनी न्यायालयात दिली. बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि जैश-ए-मोहम्मदचे उर्दू भाषेतील कागदपत्रे कुठून आली याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी न्यायालयाने पाचही आरोपींना 24 जुलैपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आरोपींनी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य कुठून आणले आणि ते सध्या कुठे लपवले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींकडे सापडलेली जैश-ए-मोहम्मदची पुस्तके कोठून आली आणि त्यांचा मुख्य स्त्रोत कोण आहे, याचीही चौकशी सुरू आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी अमीन नावाच्या व्यक्तीने नवीन आरोपींना जैशचे साहित्य पुरवले होते, तर दुसऱ्या एका आरोपीला बॉम्ब बनवण्याची पद्धत माहिती होती, असेही समोर आले आहे.

याआधी 3 जुलै रोजी गुजरात एटीएसने गुजरात आणि मध्य प्रदेशच्या विविध भागांतून जैश-ए-मोहम्मदच्या 8 संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. हे आरोपी गुजरातमध्ये सक्रिय दहशतवादी नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या चौकशीतूनच या 5 संशयित दहशतवाद्यांची नावे समोर आली आणि एटीएसने सापळा रचून त्यांना पाटण जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या.