कळमनुरीत जे पेरले तेच उगवले… मिंध्यांच्या दोन गटात तुफान यादवी! हाणामारी, गोळीबारात एक ठार, चार जखमी; 16 जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळमनुरीत गद्दाराने लावलेले गुंडगिरीचे बीज आता चांगलेच फोफावले आहे. शहरातील जुन्या बसस्थानकाच्या परिसरात मिंध्यांच्या दोन गटात तुफान यादवी झाली. हाणामारी सुरू असतानाच गोळीबार करण्यात आला. यात एक जण ठार झाला असून चौघे गंभीर जखमी झाले. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर कळमनुरीत तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

कळमनुरी शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून राजरोस अवैध धंदे चालू आहेत. अवैध दारूविक्री, मटका, जुगार पोलिसांच्या संरक्षणात चालू आहे. अवैध धंद्यांमुळे कळमनुरी शहरात कायदा सुव्यवस्था नावालाही उरलेली नाही. पोलीस तर गद्दार आमदाराचे बटीकच बनले आहेत. कळमनुरी शहरात लुकमान सिद्दिकी आणि शेख शकील शेख खलील या मिंध्यांच्या कार्यकर्त्यांमधून विस्तव आडवा जात नाही. यापूर्वीही या दोन्ही गटामध्ये हाणामाऱ्या झाल्या आहेत.

बुधवारी मध्यरात्री लुकमान सिद्दिकी आणि शेख शकील यांच्यातील वैर उफाळून आले. बसस्थानक परिसरात असलेल्या ओसामा सिद्दिकी यांच्या पानटपरीसमोर दोन्ही गट आमने सामने आले. दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हाणामारी चालू असतानाच अचानक गोळीबाराच्या १० ते १५ फैरी झाडण्यात आल्या. यात लुकमान सिद्दिकी (३८) हा जागीच ठार झाला. तर ओसामा सिद्दिकी, सारिया सिद्दिकी, इम्रान पठाण आणि मेहराज पठाण हे चारजण जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जमीर नाईक, सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे, रघुनाथ शेवाळे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे यांनीही कळमनुरीकडे धाव घेतली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लगेच बंदोबस्त वाढवण्यात आला.

जखमींना हिंगोलीला हलवले

हाणामारीत जखमी झालेल्या ओसामा सिद्दिकी, सारिया सिद्दिकी, इम्रान पठाण आणि मेहराज पठाण यांना तात्काळ कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना प्राथमिक उपचार करून हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

सात जण पोलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी शेरू ऊर्फ इम्रान अफरोज पठाण (१६) याने दिलेल्या फिर्यादीवरून शेख शकील शेख खलील, शेख जम्मू शेख खलील, शेख जमीर शेख खलील, शेख समीर शेख खलील, अजहर पठाण, शाहीन पठाण, मिंधे गटाचे नगरसेवक फयुम नाईक, किशोर भालेराव, शेख फारूख, शेख असीफ शेख खलील, साहील नाईक, शेख शहबाज शेख अशपाक, सय्यद फारूख सय्यद रहीम, मुस्तकिण शेख गनी, इम्रान खान दाऊद खान पठाण, शिबगत उर्फ शिबू खसलत नाईक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून यापैकी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नगरसेवकांकडून गोळीबार?

या प्रकरणात मिंधे गटाचे नगरसेवक फयुम नाईक आणि किशोर भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत एका महिला नगरसेविकेचा पतीही सामील होता. मिंधे गटाच्या नगरसेवकाकडूनच गोळीबार झाला, असा दाट संशय पोलिसांना आहे.

बंदूक आली कुठून?

कळमनुरीत अवैध धंदे बोकाळल्यापासून कमरेला पिस्तुले लटकावून फिरणारांची संख्याही वाढली आहे. गावठी पिस्तुलांच्या दहशतीवर गुंडगिरी करणारेही कमी नाहीत. प्रश्न असा आहे की कळमनुरीसारख्या आडवळणाला असलेल्या गावात या बंदुका आल्या कुठून? पोलिसांच्या नजरेला या बंदुका कशा पडल्या नाहीत. पोलिसांच्या मिंधेपणामुळेच शहरात गुंडगिरीला वाव मिळाला आहे. वेळीच या गुंडगिरीला वेसण घातले नाही तर कळमनुरीचे बिहार व्हायला वेळ लागणार नाही.