राष्ट्रीय स्तरावरील रायफल नेमबाज रहस्यमयरीत्या बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील हावडा येथील राष्ट्रीय स्तरावरील 15 वर्षीय प्रतिभावान रायफल नेमबाज दमयंती सेन रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. गुरुवारी सकाळी दुकानातून सामान आणायला गेलेली दमयंती परत आलीच नाही. सर्वत्र शोध घेऊनही दमयंती कुठेच सापडली नाही. दमयंतीला शेवटचे हावडा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पाहिले गेले होते.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हावडा पोलीस ठाण्यात दमयंती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिला राष्ट्रीय संघाच्या चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती आणि तिने नेमबाजीमध्ये उल्लेखनीय यश मिळवले होते, असे दमयंतीचे वडील ध्रुवज्योती सेन यांनी सांगितले. ती दररोज सकाळी नियमितपणे सराव करत असे. दमयंतीचा मोबाईल फोन घरीच होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घरात कोणताही वाद किंवा तणाव नव्हता. तिच्या अचानक बेपत्ता होण्याचे कारण अनाकलनीय आहे.

दमयंतीच्या अचानक बेपत्ता होण्याने तिचे संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि सहकारी खेळाडू अत्यंत चिंतेत आहेत. दमयंतीच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाद्वारे तिला शोधण्यासाठी मदतीचे आवाहनही केले आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून तपास सुरू केला आहे.