वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात घुमणार सिंहगर्जना! गुजरातहून आणणार दोन जोड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात लवकरच सिंहगर्जना होणार आहे. यासाठी उद्यानात गुजरातच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयातून सिंहाच्या नर-मादी अशा दोन जोडय़ा आणल्या जाणार आहेत. सिंहांच्या जोडीच्या बदल्यात उद्यानाकडून गुजरातच्या प्राणी संग्रहालयाला आशियायी कॅपेच्युन माकडांच्या तीन जोडय़ा दिल्या जाणार आहेत. पालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे.

या ठिकाणी सिंह, अॅनाकोंडासारखे नवे प्राणी, सरपटणारे जीव आणण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये सिंह मुंबईकर-पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. या सिंहाच्या जोडीच्या बदल्यात आशियाई देशात उपलब्ध असणाऱ्या कॅपेच्युन माकडांच्या तीन जोडय़ा सुमारे 80 लाख ते एक कोटीचा खर्च करून दिल्या जाणार आहेत. या सिंहांसाठी लागणारी निवास व्यवस्था, पिंजरे, मोकळी जागा आणि खाद्य देण्यासाठी लागणारी व्यवस्था याआधीच तयार करण्यात आली असल्याची माहिती आज महापौर रितू तावडे यांनी दिली. यासाठी आपण स्वतः गुजरातमध्ये जाऊन संबंधित प्राणी संग्रहालयासोबत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

असे आहे उद्यान-प्राणी संग्रहालयाचे आकर्षण

उद्यानात आता 25 पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी,  हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे 13 जातीचे
84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी आहेत. याशिवाय 283 प्रजातींचे आणि 6611 वृक्ष-वनस्पती आहेत तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत.