
‘नीट’ पेपरफुटीमुळे देशभरात खळबळ उडाली असताना राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटला होता. त्यामुळे एकंदर परीक्षा प्रक्रियेबद्दलच संशय निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच परीक्षा ऑनलाईन करण्याच्या दिशेने राज्य शासनाच्या हालचाली सुरू आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱया सर्व पायाभूत सुविधा आणि नियोजनाचा आराखडा तयार करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
ज्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातात, त्या ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या दृष्टीने तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा सखोल विचार करून ही समिती शासनाला आपल्या शिफारशी सादर करणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने राज्याचे पोलीस महासंचालक हेदेखील या समितीचे सदस्य असून सीईटी सेलचे आयुक्त सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.




























































