ताज हॉटेलला महापालिकेचा दणका! रस्ता आणि फूटपाथच्या वापरापोटी 27 कोटी रुपयांची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 मुंबईतील ‘ताज महाल कॅलेस हॉटेल’ला महानगरपालिकेने हॉटेलच्या सुरक्षेसाठी आजूबाजूचा रस्ता आणि फूटपाथ अडवून ठेवल्याप्रकरणी तब्बल 27 कोटी 12 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची थकबाकी तात्काळ भरण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या ‘ए’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी ताज हॉटेलचे एरिया डायरेक्टर आणि जनरल मॅनेजर तलजिंदर सिंग यांना यासंदर्भात एक कडक ‘स्मरणपत्र’ जारी केले आहे. थकबाकीची रक्कम सात दिवसांच्या आत जमा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.

नोव्हेंबर 2008 मधील दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेलबाहेरील रस्ता आणि फूटपाथवर सुरक्षा प्लांटर्स (मोठय़ा पुंड्या), बॅरिकेड्स लावून आणि कार पार्ंकग करून मोठय़ा प्रमाणावर जागा ताब्यात घेण्यात आली होती. ताज हॉटेलने यासाठीचे शुल्क गेल्या अनेक वर्षांपासून थकवल्याने पालिकेने आता व्याजासह वसुली सुरू केली आहे.

अशी होणार वसुली

 महानगरपालिकेने पाठवलेल्या पत्रानुसार, मार्च 2026 पर्यंतची एपूण थकबाकी आहे…
 रस्ता व्यापल्याबद्दल शुल्क सुमारे 4.97 कोटी
 फूटपाथ व्यापल्याबद्दल शुल्क सुमारे 22.15 कोटी
 एकूण देय रक्कम सुमारे 27.12 कोटी

सात दिवसांची मुदत अन्यथा कारवाई

मुंबई महानगरपालिकेने आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, ‘ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी रस्ता वापराचे दरमहा 4,15,800 आणि फूटपाथ वापराचे एपूण 82,99,554 चे शुल्क देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

  • 15 टक्के दंडात्मक व्याज – 1 सप्टेंबर 2025 पासून थकबाकीवर 15 टक्के प्रति महिना दराने व्याज आकारण्यात आले आहे. केवळ व्याजाची रक्कमच कोटय़वधींच्या घरात गेली आहे.