
मीरा रोड पूर्व येथील घोडबंदर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर टॉवर कोसळून चालकाचा मृत्यू झाला असला तरी पोलिसांनी बिल्डर आणि आर्किटेक्टच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. दुर्घटना घडून सुमारे २४ तास उलटून गेले तरी गुन्हा न दाखल झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी सायंकाळी दुर्घटनास्थळी जोरदार निदर्शने केली.
घोडबंदर परिसरात जे.पी. इन्फ्रा डेव्हलपर्स या बिल्डरच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या बांधकामासाठी येथे बसवण्यात आलेली टॉवर क्रेन गुरुवारी सायंकाळी अचानक कोसळली. या दुर्घटनेत क्रेन चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ही क्रेन नजीकच्या गृहसंकुलाच्या पार्किंगमध्ये पडल्याने चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले. इतकी गंभीर दुर्घटना घडूनही संबंधित विकासक व वास्तूविशारदाविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.































































