तुम्ही असा भ्याडपणा पाहिला आहे का? सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर विशाल दादलानी संतप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

लडाखचे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी जंतरमंतरवरील उपोषणस्थळावरून रुग्णालयात हलवल्यानंतर गायक-संगीतकार विशाल दादलानी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या 20 दिवसांपासून वांगचुक जंतरमंतर येथे उपोषण करत असून, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

 

या घटनेनंतर विशाल दादलानी यांनी इन्स्टाग्रामवर भावनिक व्हिडिओ शेअर करत सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “तुम्ही कधी असा भ्याडपणा पाहिला आहे का? त्यांनी सोनमजींना जबरदस्तीने उचलून नेले. देशात जे काही घडत आहे ते पाहून माझे मन तुटत आहे. लोक आता तरी कधी जागे होणार? मला तिथे असायला हवे होते. माझ्या मनात प्रचंड राग आहे.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHAL (@vishaldadlani)

 

 

 

सध्या अमेरिकेत असलेले दादलानी यांनी यापूर्वीही सोनम वांगचुक यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याच्या घटनेनंतर त्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया दिली. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्कर यांनीही जंतरमंतरवर जाऊन वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. त्यांनी माध्यमांशी बोलताना, “सोनम वांगचुक यांना स्वतःची मुले नाहीत, पण ते देशातील भावी पिढीसाठी लढत आहेत. त्यामुळे त्यांना आपला पाठिंबा मिळायलाच हवा,” असे म्हटले होते.

 

याआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी जंतरमंतरवर जाऊन वांगचुक यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.

 

सध्या वांगचुक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो या त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुग्णालय प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, त्यांच्या संमतीशिवाय सोनम वांगचुक यांना कोणतेही औषध किंवा उपचार देऊ नयेत.