
मुंबई लोकल बॉम्बस्फोटानंतर सर्वच स्थानकांवर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले. मात्र रोज आठ लाख प्रवाशांची एण्ट्री-एक्झिट असलेल्या ठाण्यासारख्या महत्त्वाच्या स्थानकात सुरक्षेची ऐशी की तैशी आहे. स्थानकातील मेटल डिटेक्टर भिजल्याने चक्क मेणकापडात गुंडाळून ठेवण्यात आले आहे. आश्चर्य म्हणजे १५ सीसीटीव्हीदेखील बंद आहेत. त्यातच रेल्वे पोलीस दल, सुरक्षा बलाचे अवघे ११७ कर्मचारी येथे तैनात असून १३ प्रवेशद्वार असलेल्या ठाणे स्थानकाची सुरक्षा अभेद्य ठेवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हल्लेखोरांना ‘आव जाव स्टेशन तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे.
२३ जून रोजी चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून २२ वर्षीय मयंक लोहार या तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. १५ जुलैलादेखील सीटवरून विरार लोकलमध्ये तुफान राडा झाला. याचदिवशी अंबरनाथ लोकलमध्येही ठाकुर्लीजवळ जागेच्या वादातून लोखंडी कड्याने प्रवाशाचे डोके फोडण्यात आले. या रक्तरंजित वाढत्या राड्यांमुळे सर्वसामान्य चाकरमान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्त्यानंतर सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून ठाणे ओळखले जाते. येथून दररोज ८ लाख प्रवासी प्रवास करत असतात. मात्र सुरक्षेच्या नावाने बोंबाबोंब असल्याचेच समोर आले असून स्थानक परिसरात गर्दुल्ले, भिकारी, पाकीटमारांचा सुळसुळाट असतो.
लगेच स्कॅनिंग मशीनचा चोथा
लोकल बॉम्बस्फोटानंतर सर्वच स्थानकांवर मेटर डिटेक्टर आणि लगेच स्कॅनिंग मशीन बसवण्यात आले. यातूनच पूर्वी प्रवेश करावा लागत होता. मात्र या मशीन भिजल्याने त्यांना प्लॅस्टिकच्या आवरणात गुंडाळून कोपऱ्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे स्थानकात कोण येतंय, कोण जातंय, कोणत्या वस्तूंची ने-आण केली जातेय याचा काडीमात्र पत्ता सुरक्षा यंत्रणांना लागत नाही. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा रामभरोसेच आहे.
सुरक्षा यंत्रणा कुचकामी
फलाटांवर असलेले सीसीटीव्ही आणि मेटल डिटेक्टर केवळ शोभेचे ठरत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात १७० सीसीटीव्ही असून १५५ सीसीटीव्ही कार्यरत आहेत तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ काम सुरू असल्याने तेथील १५ कॅमेरे बंद आहेत. दरम्यान सुरक्षा यंत्रणा कुचकामी असून लाखो प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एमएसएफ दलाकडे फक्त २८ तर आरपीएफकडे ८९ सुरक्षारक्षक आहेत.





























































