
महागाईमुळे विस्कटलेली आर्थिक घडी, त्यामुळे वाढलेला तणाव, बदललेली जीवनशैली, फास्ट फूडचे जादा सेवन आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे देशात पाच व्यक्तींच्या मागे एकाला निद्रानाशाचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस हे झोपेचे छुपे संकट आक्राळविक्राळ रूप घेऊ लागल्याने निद्रानाशाच्या रुग्णांमध्ये मधुमेह, रक्तदाब, चिडचिडेपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढला आहे. मुंबई शहरासह परिसरात सुमारे ४५ लाख नागरिक हे ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया या झोपेच्या विकाराने ग्रस्त असून त्यांच्यापैकी सुमारे ८० टक्के रुग्णांनी या त्रासाकडे दुर्लक्ष केले आहे.
नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात झोपेशी संबंधित विकारांवर आयोजित करण्यात आलेल्या चर्चा सत्रात सहभागी झालेल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. निद्रानाशाच्या रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या विकाराकडे मोठ्या संख्येने रुग्ण हे दुर्लक्ष करत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये निद्रानाशाची समस्या सर्वाधिक प्रमाणात आढळून येत आहे. झोप व्यवस्थित होत नसल्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. घोरणे ही समस्या किरकोळ नाही. त्यामुळे काही जणांचा झोपेत श्वास थांबत असल्याने मेंदू आणि हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे, असे अपोलो रुग्णालयाच्या पल्मोनॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. जयलक्ष्मी टी. के. यांनी यावेळी स्पष्ट केले.
झोप उत्तम आरोग्याचा पाया
झोप फक्त ऐषोआराम नाही तर उत्तम आरोग्याचा पाया आहे. त्यामुळे झोपेच्या दर्जाकडे प्रत्येकाने लक्ष देणे आवश्यक आहे. माणसाला दर्जेदार झोप मिळाली तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. आमचे उद्दिष्ट हे फक्त झोपेच्या विकारांवर उपचार करणे नसून या विकारांबाबत जनजागृती करणे आहे. नागरिकांना दर्जेदार झोपेचे महत्त्व समजले तर त्यांना आपली जीवनशैली निरोगी ठेवता येईल, अशी प्रतिक्रिया अपोलो सीईओ अरुणेश पुनेथा यांनी व्यक्त केली आहे.





























































