
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, रत्नागिरी यांच्या वतीने “ऑप सिंदूर” पश्चात “ऑप अभ्यास” अंतर्गत 360 स्वयंसेवकांसाठी ‘क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
भविष्यातील संभाव्य आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीचा सक्षमपणे सामना करण्यासाठी नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वयंसेवकांनी या प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान आणि कौशल्य प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी प्रभावीपणे वापरावे, असे आवाहन कोस्टगार्ड कमांडर शैलेश गुप्ता आणि एन.सी.सी. 2 नेव्हल युनिटचे सी.ओ. रामानुजन दीक्षित यांनी केले.
केंद्र शासनाचे गृह मंत्रालय आणि राज्य गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, युद्धजन्य किंवा कोणत्याही मोठ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरी संरक्षण दलाची भूमिका ही प्रशासनाचा मुख्य कणा असते. म्हणूनच, अधिकाधिक नागरिकांपर्यंत नागरी संरक्षण व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आणि जनजागृती पोहोचवणे काळाची गरज आहे.
उपनियंत्रक नागरी संरक्षण निवृत्त ले. कर्नल प्रशांत चतुर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. या प्रशिक्षणात प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन, आपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश होता.



























































