कोचिंग यार्डमध्ये आढळला मानवी पाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसच्या कोचिंग यार्डमध्ये आज मानवी पाय आढळला. अमृतसर-छत्रपती शिवाजी महाराज एक्स्प्रेसच्या देखभालीचे काम सुरु असताना तो मानवी पाय दिसला. या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या कोचिंग यार्ड मध्ये गाडी धुण्याचे सुरु होते. तेव्हा गाडीच्या खालच्या भागाची (अंडरगिअर) तपासणी करत असताना, एका कर्मचाऱ्याला एम 2 कोचच्या ट्रॉलीखाली अडकलेला तुटलेला पाय दिसला. त्याने याची माहिती छ.शि.म.ट. रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी तो पाय ताब्यात घेतला. गाडीसोबत हा पाय कसा आला, तसेच तो पाय नेमका कोणाचा आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. गाडीच्या मार्गावरील अपघाती मृत्यूच्या सर्व नोंदी तपासल्या जाणार असल्याचे समजते. छ.शि.म.ट. रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून तो पुढील तपासणीसाठी सेंट जॉर्जेस रुग्णालयात पाठवला आहे.