मानखुर्द दुर्घटनेतील कंत्राटदाराचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला; बांधकाम बेकायदा, मानवी जीवनासाठी धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानखुर्द येथे चार मजली बेकायदा इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कंत्राटदार अब्दुल इद्रिसी याला मुंबई सत्र न्यायालयाने आज दणका दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी आरोपी कंत्राटदाराचा जामीन अर्ज आज फेटाळला. तसेच संबंधित बांधकाम बेकायदा असून ते मानवी जीवितासाठी धोकादायक असल्याची माहिती आरोपीला होती, तसे प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

 

मानखुर्दच्या मंडाळे परिसरात ५ जुलै रोजी ही दुर्घटना घडली होती. चार मजली घर शेजारील झोपडीवर कोसळल्याने झोपडीत राहणाऱ्या पाच जणांसह तक्रारदाराच्या नातीचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या तपासानुसार, अब्दुल इद्रिसी व त्याच्या वडिलांनी कंत्राटदार म्हणून हे बांधकाम केले. पूर्वी झोपडी असलेल्या जागेवर गेल्या चार वर्षांत कोणतीही परवानगी न घेता चार मजली घर उभारण्यात आले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला.

 

सक्षम प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता आरोपी बेकायदा बांधकाम करत असल्याची त्याला पूर्ण जाणीव होती. तसेच संबंधित इमारत केवळ रहिवाशांसाठीच नव्हे, तर परिसरातील नागरिकांसाठीही असुरक्षित होती, इतकेच काय तर यापूर्वी इमारतीच्या समोरील बाजूवरून फरशी खाली पडून एका रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेची माहिती आरोपीला देण्यात आली होती. तरीही त्याने आवश्यक उपाययोजना न करता बांधकाम तसेच सुरू ठेवले. त्यामुळे गुन्ह्याचे स्वरूप आणि गंभीरता लक्षात घेता आरोपीला जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.