
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेत पाठिंबा दिला आहे. आगामी २० तारखेला संसदेचे कामकाज सुरू होताच, आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे आंदोलनास्थळी बोलताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आगामी २० तारखेला जेव्हा संसदेचे सत्र सुरू होईल. तेव्हा आम्ही हा संपूर्ण मुद्दा अत्यंत ताकदीने सभागृहात मांडू, या सर्व प्रश्नांना जबाबदार धरून आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी संसदेत करणार आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सलग २० दिवस पूर्ण होत आहेत ,त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे केंद्र सरकार अतिशय असंवेदनशील आणि बधिर आहे. देशातील एक महत्त्वाचा व्यक्ती २० दिवस अन्नत्याग करून बसला आहे, मात्र सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधण्याची तसदी घेतलेली नाही. लोकशाहीत सरकारने किमान चर्चेसाठी तरी पुढे यायला हवे होते, पण त्यांनी जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.





























































