महत्त्वाच्या प्रश्नांवरील चर्चा टाळण्यासाठी सरकार संसदेचे कामकाज चालू देणार नाही – गौरव गोगोई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नांवरील चर्चा टाळण्यासाठी आणि आपली जबाबदारी झटकण्यासाठी सरकार संसदेचे कामकाज योग्य प्रकारे चालू देणार नाही, अशी भीती गोगोई यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना गौरव गोगोई म्हणाले की, आगामी पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्ष जनतेशी संबंधित सर्व महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करणार आहे. अयोध्येशी संबंधित मुद्दे, देशाची शिक्षण व्यवस्था, ऑटोमोबाईल उद्योग आणि परराष्ट्र धोरण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर केंद्र सरकार संसदेत उत्तरे देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारला आपली जबाबदारी टाळायची असल्याने आणि उत्तरे देण्यापासून पळ काढायचा असल्याने ते संसदेत या विषयांवर चर्चा होऊ देणार नाहीत, असा थेट आरोप त्यांनी केला.

अधिवेशनातील वैधानिक कामकाजाबाबत बोलताना गोगोई म्हणाले की, काँग्रेस पक्ष संसदेत मांडल्या जाणाऱ्या प्रस्तावित विधेयकांवर इंडिया आघाडीतील मित्रपक्ष आणि इतर विरोधी पक्षांसोबत सविस्तर चर्चा करेल. सर्वसहमती झाल्यानंतरच या विधेयकांबाबत सामूहिक निर्णय घेतला जाईल, असे गोगोई यांनी सांगितले. जनतेच्या आयुष्याशी निगडित असणारा प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा आम्ही संसदेत लावून धरू, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.