बद्रीनाथ मंदिर देणगी चोरी प्रकरण, मंदिराचे माजी अधिकारी राजेंद्र चौहान यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बद्रीनाथ मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, या प्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) शुक्रवारी मंदिराचे माजी अधिकारी राजेंद्र चौहान यांना अटक केली आहे. सलग चार तास चाललेल्या सखोल चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपासासाठी चौहान यांना शनिवारी, १८ जुलै रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या प्रकरणातील प्रमुख संशयितांपैकी एक असलेल्या राजेंद्र चौहान यांची प्रामुख्याने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चौहान २२, २५ आणि २९ जून रोजी रोख रकमेचे बंडल गोळा करून स्वतःच्या खिशात ठेवताना दिसत आहेत. याच पुराव्यांच्या आधारे एसआयटीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने तयार केलेला १८ पानांचा अंतर्गत चौकशी अहवाल एसआयटीकडे सोपवल्यानंतर या तपासाला अधिक गती मिळाली आहे.

सध्या एसआयटीकडून मंदिराच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूममधून २९ जून आणि २ जुलैचे फुटेज ताब्यात घेऊन त्याची बारकाईने तपासणी केली जात आहे. या नव्या फुटेजच्या आधारे आणखी काही संशयितांची ओळख पटली असून, त्यांचीही लवकरच चौकशी केली जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याशिवाय देणगीच्या रकमेच्या व्यवस्थापनातील त्रुटी तपासण्यासाठी एसआयटीने मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंग रांगड आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अतुल डिमरी यांचीही चौकशी केली आहे. भक्तांनी दिलेली देणगी कशी हाताळले जाते हे समजून घेण्यासाठी, एका विशेष समितीने १४ जुलै रोजी बद्रीनाथ धामला भेट देऊन मोजणी कक्षातील संपूर्ण प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला होता.