
राजापूर तालुक्यातील वाटूळ येथील ग्रामीण भागातील मार्गावर भरदिवसा एका रिक्षाचालकाला बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना घडली. अचानक रस्त्यावर बिबट्या दिसताच रिक्षाचालक काही काळ घाबरून गेला. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा अन्य अनुचित प्रकार घडला नाही.
या घटनेनंतर या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तसेच शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने परिसराची पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, नागरिकांनी एकट्याने निर्जन भागात जाणे टाळावे, रात्री किंवा पहाटेच्या वेळी विशेष काळजी घ्यावी आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास अथवा त्याच्या हालचाली आढळल्यास तात्काळ वन विभाग किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

































































