25 वर्षांखालील मुलांवर सर्वाधिक गुन्हे, तरुणाईचा ’आवाज’ दाबला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मैदानात उतरलेल्या तरुणाईविरोधात मुंबई पोलिसांनीही कारवाईचा जुलमी बडगा उगारला. मुंबई पोलिसांच्या एफआयआरमधील आरोपींच्या यादीत निम्म्याहून अधिक नावे 25 वर्षांखालील मुलांची आहेत. त्यातही प्रत्येकी पाच आरोपींपैकी एकाचे वय 18 ते 20 वर्षे वयोगटातील आहेत. तसेच दर तिसऱ्या व्यक्तीच्या रूपात तरुणींना टार्गेट केले आहे.

मुंबईत गेल्या आठवडय़ात आंदोलन सुरू झाल्यापासून मुंबई पोलिसांनी सुमारे 1,500 लोकांविरुद्ध 15 एफआयआर दाखल केले आहेत. त्यापैकी मंगळवारी दाखल केलेले आठ एफआयआरनंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एकाच एफआयआरमध्ये एकत्रित करण्यात आले. संबंधित आठपैकी सात एफआयआरमधील आरोपींची यादी वयाच्या तपशिलासह उजेडात आली आहे. या एफआयआरमध्ये आरोपी बनवण्यात आलेल्या तरुण-तरुणींच्या वयोगट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. आरोपी बनवलेली निम्म्याहून अधिक नावे 25 वर्षांखालील तरुण-तरुणींची नावे आहेत. गृहखात्याच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे

बेकायदेशीर जमाव आणि कायदेशीर आदेशांचे उल्लंघन करणे अशा आरोपांखाली गुन्हे नोंदवले असून त्यात जास्तीत जास्त दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

सात एफआयआरमध्ये नाव असलेल्या 301 लोकांपैकी 261 जणांच्या वयाचा तपशील उघड झाला आहे. मात्र उर्वरित 40 जणांचे वयच नोंदवलेले नाही. काहींचा उल्लेख फक्त ‘विद्यार्थी’ असा केला आहे.

आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेली तरुणाई

57 आरोपी 18 ते 20 वर्षे वयोगटातील. n 80 आरोपी 21 ते 25 वर्षे वयोगटातील. n 53 आरोपी 26 ते 30 वयोगटातील.

मिठाईच्या दुकानातून थेट पोलीस ठाणे!

सीएचा अभ्यास करणाऱ्या 20 वर्षांच्या विद्यार्थ्यावर कारवाई करताना कहरच केला. क्लास संपल्यानंतर तो विद्यार्थी मिठाईच्या दुकानात गेला होता. मोबाईलवर आंदोलन शूट केले म्हणून त्याला शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.