धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय जंतरमंतरवरून हटणार नाही; अभिजीत दिपके यांचा मोदी सरकारला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर 26 व्या दिवशी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि लडाखच्या ॲपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेतेही उपस्थितीत वांगचुक यांनी उपोषण सोडले. वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी एक व्हिडीओ शेअर करत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे.

सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. कारण त्यांचा जीव देशासाठी मौल्यवान आहे. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी जोपर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहील. वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण आणि दिल्ली पोलिसांनी ज्या निर्दयपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्या विद्यार्थ्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे अभिजीत दिपके यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटले. त्यानंतर थेट जंतरमंतरवर जाऊन विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला.

हे वाचा – संसदेबाहेर एकतर्फी ‘मन की बात’ बंद करा आणि शिक्षणमंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्या; मोदींच्या व्हिडीओवर खरगेंची कडाडून टीका

20 जुलैला संसदेवर निघालेल्या मोर्चात शेकडो विद्यार्थ्यांची डोकी फोडण्यात आली. सोनम वांगचुक यांना 26 दिवस उपोषण करावे लागले. आता शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आम्हाला काहीही मंजूर नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर आम्ही इथून हटणार, असे अभिजीत दिपके म्हणाले. यावेळी ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो… राजीनामा दो…’, ‘इस्तिफा तुमको देना होगा… देना होगा’, अशा प्रचंड घोषणांनी जंतरमंतरचे मैदान दणाणून गेले.

धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडल्याशिवाय आंदोलन थांबणार नाहीत. कोणतीही बैठक तटस्थ ठिकाणीच झाली पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आम्हाला काहीही मान्य असणार नाही, असेही दिपके यांनी स्पष्ट केले. तसेच कॉक्रोच जनता पार्टीच्या आशुतोष रांका यांनीही धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतरमंतरवरील आंदोलन सुरूच राहील असे सांगितले.

हातात संविधान घेऊन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री रस्त्यावर उतरली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, Photo व्हायरल

सीसीआयमध्ये दुपारी 12.30 वाजता जे. पी. नड्डा यांच्यासोबत बैठक नियोजित आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र सिंह देखील तेथे उपस्थित राहू शकतात. या बैठकीत जे काही ठरेल ते तुमच्या सर्वांसोबत शेअर केले जाईल. तसेच आम्ही सकाळी 11 वाजता एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यात अधिक तपशील दिले जातील, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.