
आखातातील तणाव अत्यंत शिगेला पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या हल्ल्याची तयारीही पूर्ण झाली असून फक्त निर्णय घेणे बाकी असल्याचे ट्रम्प म्हणाले. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
“आम्ही इराणवर एका महाकाय हल्ल्याचा विचार करत आहोत. हा हल्ला आजवरच्या कोणत्याही हल्ल्यापेक्षा मोठा असेल. मी या निर्णयाच्या अतिशय जवळ पोहोचलो असून आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे”, असा इशारा ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला. ट्रम्प यांच्या आवाहनावर इस्रायलदेखील या लष्करी कारवाईत सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येमनमधील हुती बंडखोरांनी लाल समुद्रात सौदी अरेबियाच्या दोन तेलाच्या टँकर्सवर केलेल्या हल्ल्यांनंतर परिस्थिती अधिक बिघडली आहे. हुती हे इराणचे प्रॉक्सी असल्याने या हल्ल्यांची संपूर्ण जबाबदारी इराणचीच असेल. इराणला अद्याप त्यांच्या कृत्याची पुरेशी शिक्षा मिळालेली नाही आणि वाटाघाटींच्या टेबलावर आणण्यासाठी त्यांच्यावर लष्करी दबाव वाढवणे आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर इराणही आक्रमक झाला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. अमेरिकेने हल्ले सुरूच ठेवले तर, याची आणखी मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच युद्ध संपवण्याचा मार्ग चर्चा असून हल्ले नाहीत, असेही ते म्हणाले.
जेनेरिक औषधांवर 200 टक्के टॅरिफ; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, हिंदुस्थानला मोठा फटका बसण्याची शक्यता
चर्चा ठप्प
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी इराणवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे, तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेची अरेरावी आणि अवाजवी मागण्यांमुळेच शांतता चर्चा ठप्प झाल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या थेट धमकीमुळे आखातात युद्ध भडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


























































