
केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याने डॉक्टरांना केलेल्या मारहाणीची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने केडीएमसी प्रशासनाला चांगलेच फटकारले. डॉक्टरांवर हल्ला झाल्यानंतर नियमाप्रमाणे तत्काळ गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत न्यायालयाने महापालिकेकडून स्पष्टीकरण मागितले आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी संबंधित डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.
बुधवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे याच्यावर गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याबद्दल केडीएमसी प्रशासनाला फटकारले होते. यासंदर्भात आज केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर संबंधित विभागाकडून तत्काळ पोलिसांत तक्रार का दाखल झाली नाही, याबाबत आम्ही संबंधित डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांकडून अहवाल मागवणार आहोत असे सांगितले. हा अहवाल आल्यानंतर न्यायालयात वस्तुस्थिती मांडली जाणार आहे.
सहा तासांच्या आत गुन्हा का दाखल नाही?
सुनावणीदरम्यान न्यायालयाने एफआयआर दाखल होण्यास झालेल्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डॉक्टरांवरील हल्ल्यासारख्या गंभीर प्रकरणात सहा तासांच्या आत गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना महापालिका रुग्णालयाकडून तातडीने तक्रार नोंदवण्यात आली नाही. उलट दुसऱ्या दिवशी एफआयआर दाखल झाल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत केडीएमसी प्रशासनाला नोटीस बजावली.





























































