
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या नीट पेपर लीक प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत सरकारकडे उत्तरदायित्वाची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी यानेही सोशल मीडियावर एक संतप्त पोस्ट शेअर करत भाजप समर्थकांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे सुव्रत जोशीने लिहिले की, “प्रिय भाजप समर्थकांनो, तुम्ही एक लाख विद्यार्थ्यांकडून पूर्ण जबाबदारीची अपेक्षा करता. आंदोलन शांततेत व्हावे, कोणतीही चूक होऊ नये, अशी अपेक्षा ठेवता. मात्र, शिक्षणमंत्र्यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही, हा प्रश्न तुम्ही विचारत नाही. कारण तुम्ही पंतप्रधानांना ‘देव’ मानता.” अशी टीका त्याने केली आहे.
नीट पेपर लीक प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत सुव्रत जोशी यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले असून, तर काहींनी त्यावर टीका केली आहे. अभिनेता म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून त्यांनी व्यक्त केलेली भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
यासोबतच त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करत विचारले, “एका मंत्र्याचा राजीनामा घेणे सोपे आहे की, एक लाख विद्यार्थ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे? पेपर लीकसारख्या गंभीर प्रकरणात जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांनाच दोष देण्याऐवजी संबंधित यंत्रणा आणि सरकारने उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.



























































