ऐन गर्दीच्या वेळी रेटारेटी,  कल्याण एसी लोकलचा लोच्या; 8.54 चे दरवाजेच उघडले नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने ठप्प होणारी मध्य रेल्वेची लोकल सेवा आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली. सकाळी पिकअवरलाच कल्याण एसी लोकलचा लोच्या झाला. कल्याण रेल्वे स्थानकात सकाळी ८.५४ वाजताच्या कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत. परिणामी प्रचंड रटारेटी झाली. २० मिनिटांच्या कसरतीनंतर दारे बंद झाली आणि लोकल मार्गस्थ झाली.

मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडाच्या घटना वारंवार घडत असूनही रेल्वे प्रशासन मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. आज सकाळी याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. सकाळी ८.५४ वाजताच्या कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही दरवाजे उघडले नाहीत. तर काही अर्धवट उघडले. आधीच खचाखच भरलेल्या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी धावपळ झाली. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी दरवाजांजवळील प्रवाशांना बाहेर काढून दरवाजे बंद करण्यासाठी प्रयत्न केले. २० मिनिटांच्या गोंधळानंतर दरवाजे बंद झाले आणि लोकल मार्गस्थ झाली. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवेचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

प्रवाशांचा उलट दिशेने प्रवास

कल्याण रेल्वे स्थानकात या एसी लोकलमध्ये अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा भागातून आलेले प्रवासी प्रवास सुरू करतात. अगोदरच उलट दिशेने आलेल्या प्रवाशांमुळे लोकल मधील आसने भरलेली असतात. त्यातच दरवाजे बंद होत नसल्याने प्रवाशांना चढ-उतार करताना मोठी गैरसोय होऊन चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली.