पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, दोषींवर कारवाईसाठी उचलणार पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात सध्या पेपरफुटीचे प्रकरण गाजत आहे. दिल्लीतील जंतरमंतरसह सर्वच राज्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून आंदोलन चांगलेच पेटले आहे. या आंदोलनाला विरोधकांनीही पाठिंबा दिला असून विद्यार्थ्यांसोबत विरोधकही रस्त्यावर उतरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत. पावसाळी अधिवेशनामध्येही हा मुद्दा गाजत आहे. आता या पेपरफुटीच्या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पेपरफुटी प्रकरणांतील दोषींना त्वरित आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन केली जातील, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तरुणांचे भविष्य हीच आमची प्राथमिकता असल्याचे मोदी म्हणाले. तसेच पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. मात्र या पोस्टमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.

“देशातील तरुण वर्गाचे कल्याण आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य यापेक्षा आमच्यासाठी काहीही महत्त्वाचे नाही. पेपरफुटीच्या घटनांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत आणि त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही”, असे मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून देशात पेपरफुटीच्या घटनांवरून वातावरण तापले आहे. कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतर येथे निदर्शने सुरू केली असून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत. सीजेपीच्या या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस, आम आदमी पार्टीसह प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जंतरमंतर येथे जाऊन सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि विद्यार्थ्यांची भेट घेतली होती.

आंदोलन चिघळू देऊ नका, परिणाम भयानक होतील! आदित्य ठाकरे यांचा सरकारला गंभीर इशारा

आंदोलकांवर लाठीचार्ज

दरम्यान, 20 जुलै रोजी आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता परिस्थिती हाताबाहेर गेली. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने दिल्लीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आणि रॅपिड अॅक्शन फोर्सने विद्यार्थ्यांवर लाठीचार्जही केला होता. त्यानंतर हे आंदोलन आणखी चिघळले आणि जंतरमंतरवर विद्यार्थ्यांची गर्दी वाढली. यासह देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

 

View this post on Instagram